महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

0

जळगाव । राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका कायम असला तरी वातावरणात हळूहळू बदल होत असून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. IMD ने आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान, जळगाव, पुणे, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतही विजांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकणातील काही भागांमध्येही ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. राज्यातील अनेक भागांत दिवसा उकाडा कायम राहणार असून, सायंकाळनंतर वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.