“लाडक्या बहिणींना मोफत साडी देणंही सरकारला परवडत नाही का?” रोहिणी खडसेंचा राज्य सरकारवर तिखट हल्ला

0

जळगाव : राज्य सरकारने मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी महिलांना मोठमोठी आश्वासने देणारे सरकार आता त्याच योजनांपासून माघार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, “लाडक्या बहिणींना मोफत साडी देण्याची घोषणाही आता सरकारला परवडत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात विविध योजनांची घोषणा करून मतदारांचा विश्वास मिळवला, मात्र आता आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत त्या योजनाच बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांची सातत्याने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगत खडसे यांनी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी केली. आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे करून जनतेशी केलेली वचने मोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असून, सरकार या निर्णयावर फेरविचार करणार का, याकडे राज्यभरातील महिलांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.