मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातून 6 खासदार फुटले आहेत. तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात देखील नुकतीच मोठी फूट पडली होती. 20 खासदारांनी पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये या सर्व घडामोडी घडत असतानाच उद्धव ठाकरे यांनी देखील सावध भूमिका घेत रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. 5 व्हिसीद्वारे उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे.

तेव्हाच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. 6 खासदार हे ठाकरे गटातून फुटले आहेत. ते वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जात आहे.


दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून जे खासदार फुटले आहेत, त्यांच्यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील समावेश आहे. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कृष्णा पाटील आष्टीकर यांनी या सर्व प्रकरणावर घेतलेली भूमिका ही नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आघाडीचा होतो आणि आघाडीचाच राहणार आहे. कुठली तरी बातमी आली आणि माझ्यावर शंका उपस्थित केली जात आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा पळून जाणार गडी नसून मैदान मारणारा गडी आहे. समोरच्यांना आवाहन पेलावत नसल्याने संभ्रम पसरविला जातो आहे. भूलथाप्पांना बळी पडू नका, अशी आपली भूमिका यावेळी कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जाहीर केली आहे.