मोठा ट्वीस्ट! शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा ठाकरेंकडे येणार; ठाकरेसेनेच्या दाव्याने खळबळ
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अॅापरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा आता मोठ्या प्रमाणावर होण्यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या नऊपैकी सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले जात आहे.

या गटाला अधिकृत मान्यता मिळाल्यास सहा खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलिन होईल, यामुळे साहजिकच शिंदेंच्या शिवसेनेची लोकसभेतील ताकद वाढणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. सहापैकी दोन खासदारांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने ते पुन्हा ठाकरे गटात येतील. या दाव्यामुळे आता अॅापरेशन टायगरमध्ये मोठा ट्वीस्ट आला आहे.


या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी सर्व खासदारांना व्हीप जारी करत संसदीय पक्षाची दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला सहापैकी किती खासदार उपस्थिती लावतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान, कथित ‘ऑपरेशन टायगर’वर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत यांनी आपल्या खासदारांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. तसेच, ऑपरेशन टायगर खरोखर यशस्वी झाले असेल तर संबंधित खासदारांचे चेहरे समोर आणावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
दोन खासदार पुन्हा ठाकरेंकडे येणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेत असलेल्या सहा खासदारांपैकी दोन खासदारांची काही आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसल्याने त्यांनी संबंधित पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे हे दोन्ही खासदार आजच्या बैठकीला उपस्थित राहतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाला आहे. ते दोन खासदार कोण याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे.
संभ्रम कायम
ठाकरे गटाकडे सर्व लोकसभा खासदार आपल्यासोबत असल्याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. दुसरीकडे, शिंदे गटाकडूनही सहा खासदारांच्या स्वाक्षऱ्या वैध ठरल्याची किंवा लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केल्याची अधिकृत माहिती अथवा तसा फोटो अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे अॅापरेशन टायगरबाबत संभ्रम कायम आहे. तसेच आपल्या खासदारांविरोधात कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना ठाकरे गटाने आपल्या नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.