निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंची मुंबईत महामोर्चाची घोषणा

0

मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना घाम फोडणारी बातमी आहे. एकीकडे कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिलेला असतानाच दुसरीकडे ठाकरे बंधुंनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महामोर्चाचं आयोजन केलं आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टवरून दिली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक आयुक्तांविरोधात मोर्चा काढण्याची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. हा मोर्चा एका पक्षापुरता न राहता तर तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.