खासदार स्मिता वाघ यांच्या अभ्यासू कामगिरीला सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’चा बहुमान
जळगाव । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांच्या संसदीय कामगिरीची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. लोकसभेतील प्रभावी उपस्थिती, जनतेच्या प्रश्नांची सातत्याने मांडणी आणि लोकहिताच्या विषयांवरील सक्रिय भूमिकेमुळे त्यांना हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला.
संसदेतील कामकाजात खासदार स्मिता वाघ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९६ टक्के उपस्थिती नोंदवली. याशिवाय त्यांनी २६९ प्रश्न उपस्थित करून विविध लोकहिताच्या मुद्द्यांना संसदेत आवाज दिला. तसेच ५३ चर्चांमध्ये सहभाग घेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. संसदीय प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत त्यांनी पाच खासगी विधेयकेही सादर केली.


त्यांच्या अभ्यासू, समर्पित आणि जनतेप्रती उत्तरदायी कार्यशैलीची दखल घेत ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, पुरस्कार जाहीर होताच भाजप कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिकांकडून खासदार स्मिता वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याची संसदीय पातळीवर पुन्हा एकदा देशभरात चर्चा होत आहे.