परतीचा पाऊस पडणार का? पंजाबराव डखांचा मोठा अंदाज
मुंबई । राज्यातील बहुतांश भागात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि करपत चाललेली पिके यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाळा सुरू होऊन जवळपास चार महिने उलटत आले असताना आता परतीचा पाऊस तरी बरसणार का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काळातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

२६ सप्टेंबरपासून राज्यात काही भागांत कोरडे वातावरण


पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, २६ सप्टेंबरपासून राज्यातील काही भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. दुपारपर्यंत ऊन चांगले पडून त्यानंतर काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले. मात्र, हा पाऊस सर्वदूर होणार नसून विखुरलेल्या स्वरूपातच पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण मर्यादित भागातच तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्व विदर्भात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता
डख यांच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भात चांगला पाऊस होऊ शकतो, तर पश्चिम विदर्भात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे. उर्वरित भागांत मात्र पावसाची शक्यता तुलनेने कमी राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.विखाखापट्टणमजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही डख यांनी सांगितले.
२९ आणि ३० सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे संकेत
दरम्यान, २९ आणि ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून कोकण किनारपट्टी भागातही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.मात्र, उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडून अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी आगामी काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.