RBIचा मोठा निर्णय! रेपो रेट 0.25% वाढला; होम लोनसह EMI महागणार
मुंबई । वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांना लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के (२५ बेसिस पॉईंट्स) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज एका पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली.

या नव्या वाढीमुळे देशाचा मुख्य रेपो रेट ५.२५ टक्क्यांवरून वाढून ५.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार असून, होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचे हप्ते (EMI) आता महागणार आहेत.


ईएमआय वाढणार?
जेव्हा रिझर्व्ह बँक रेपो रेट वाढवते, तेव्हा बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महाग होते. साहजिकच, बँका हा वाढलेला बोजा ग्राहकांवर टाकतात आणि कर्जाचे व्याजदर वाढवतात. त्यामुळे तुमचे आधीच कोणतेही कर्ज सुरू असेल, तर आता तुमच्यावर दोन पर्याय राहतील: एकतर तुमच्या महिन्याचा ईएमआय (EMI) वाढेल किंवा तुमच्या कर्जाचा एकूण कालावधी (Tenure) वाढवला जाईल.
यापूर्वी कधी बदल झाला होता?
आरबीआयने यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढवून तो ६.५ टक्के केला होता. त्यानंतर वर्षभरात (२०२३-२४ मध्ये) या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. तर २०२५ मध्ये आरबीआयने व्याजदरात कपात (कमी) करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा महागाईच्या पार्श्वभूमीवर रेपो रेट ५.२५ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे कर्जधारकांची चिंता वाढली आहे.