“आता नाही, भाऊबीजेला नक्की येईन!”; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर
मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानाच अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत,” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी त्यांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, आंदोलन सुरू असताना जेवणाचे निमंत्रण स्वीकारणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.


“ताईंनी सांगितलं आहे ना, मग जेवायला पण जाऊ”
मनोज जरांगे म्हणाले, “ताईंनी सांगितलं आहे ना, मग जेवायला पण जाऊ. पण भाऊबीजेच्या वेळी. आता आंदोलन सुरू आहे. भाऊ मैदानात असताना बहिणीने बोलवू नये. भाऊ संकटात जातो. बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा.”
आपण भाऊबीजेच्या वेळी नक्कीच अमृता फडणवीस यांच्या घरी जाऊ, असेही त्यांनी सांगितले. “आमच्या बहिणींनी आम्हाला भाऊबीजेला बोलवावं. साडी-चोळी घेऊन जातो. दिलेला शब्द आहे मनोज जरांगेचा,” असे ते म्हणाले.
“आज जेवायला गेलो तर लढाईच्या मैदानातून माघार घ्यावी लागेल”
आंदोलनाच्या काळात जेवणासाठी जाणे योग्य नसल्याचे सांगताना जरांगे यांनी “आज मात्र जेवायला बोलवू नये,” असे म्हटले. ते पुढे म्हणाले की, “फक्त आज लढायच्या मैदानातून तुम्ही जेवायला या म्हणाल तर हार पत्कारावी लागेल ताई. ताईंनी तो विचार, दृष्टीकोन आणि मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी.”