राज्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 48 तास घराबाहेर पडूच नका, या जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा

0

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, विशेषतः विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथा परिसरासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भातील काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथा, कोकण किनारपट्टी, भंडारा, गडचिरोली, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात विदर्भात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून २८ आणि २९ जुलैदरम्यान काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, मंगळवारपासून राज्यभर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २८ आणि २९ जुलैदरम्यान अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते २७ जुलै या कालावधीत विदर्भातील ११ जिल्ह्यांत सरासरी २६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. आगामी पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता असली तरी संपूर्ण तूट भरून निघणे कठीण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

कोकणातही पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्टी आणि रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.