मुक्ताईनगरात १९ वर्षीय तरुणाचा चाकूने खून; १७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी गावात जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली. अबुजर रफीक शेख (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील संशयित हा १७ वर्षीय युवक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जुन्या भांडणातून चाकूने हल्ला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता बेलसवाडी गावातील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर ही घटना घडली. मागील भांडणाच्या कारणावरून अबुजर आणि गावातील १७ वर्षीय युवकामध्ये वाद झाला.

या वादातून संशयिताने अबुजरच्या छातीत चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यात अबुजर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. डीवायएसपी नंदराज पाटील आणि पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे पोहेकॉ. निलेश गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

मुक्ताईनगर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम तसेच इतर बाबींची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

या घटनेमुळे बेलसवाडी परिसरात खळबळ उडाली असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अल्पवयीन संशयिताविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.