मनुदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचा चांदीचा ऐवज लंपास, चोरट्यांचा शोध सुरू

0

यावल । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मनूदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातून मनूदेवी आणि रेणुका मातेच्या मूर्तींवरील सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने देवीच्या मूर्तींवरील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

मनुदेवी मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, ज्याची किंमत ४० हजार ५०० रुपये, तसेच २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, किंमत २७ हजार रुपये चोरीला गेली.तसेच रेणुका मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, किंमत ४० हजार ५०० रुपये आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, किंमत २७ हजार रुपये चोरट्याने लंपास केली. अशाप्रकारे एकूण १ किलो वजनाचा आणि १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरीला गेला आहे.

सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस
७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी आणि सेवक मंदिरात आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मंदिराच्या दरवाजांचे कुलूप आणि गाभाऱ्याचा दरवाजा तोडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.या प्रकरणी आडगाव येथील रहिवासी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(डी) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.