एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून रोहिणी खडसेंचा सरकारला खोचक टोला

0

जळगाव । नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी एक झटका बसला आहे. १ ऑक्टोबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच वाढत्या गॅस दरवाढीने व्यावसायिकांचे कंबरडी मोडली गेली आहे. त्यात दिलासा देण्याऐवजी सातत्याने व्यावसायिक सिलिंडर महाग होत असल्याने हॉटेल, खानावळ, कॅन्टीन आणि खाद्य पदार्थ आणखी महागण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष फटका ग्राहकांनाही बसू शकतो.दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीवरून राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

हल्ली 1 तारीख आली की मनात धडकी भरते. सरकार कुठल्या बाजूने आम्हा सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करेल सांगता येत नाही. आज 1 ऑक्टोबरपासून जनतेच्या आर्थिक गोष्टींवर विविध नियम लावून सामान्य जनतेला झटका दिलाच होता, पण व्यवसायिक सिलेंडरचे दर 70 रुपयांनी वाढवून ‘बोनस’ झटका दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला जे व्यवसायिक सिलेंडर 1684 रुपयांना मिळायचे ते आता 2954 रुपयांना मिळत आहेत. 9 महिन्यात जवळपास 1500 रुपयांची वाढ झाली आहे, असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलं आहे.

व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले म्हणजे हॉटेल, खानावळ, कँटीनचे जेवण महागले. याचा थेट फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसेल पण सामान्य माणसाने नाराज व्हायचे नाही. आपला जीडीपी 7.8 टक्क्यांनी वाढला यातच आनंद व्यक्त करायचा, असा खोचक टोलाही रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.