जळगावात ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची धडक; कंपार्टमेंटमध्ये आढळले तरुण-तरुणी
जळगाव । कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या संशयावरून जळगावातील हेवन कॅफेवर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. ३० सप्टेंबर रोजी एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कॅफे मालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंगदरम्यान दामिनी पथकाला हेवन कॅफेमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना माहिती दिली.


निरीक्षक साळवे यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाने हेवन कॅफेवर छापा टाकला.
कंपार्टमेंटमध्ये तरुण-तरुणी आढळले
पोलिसांच्या कारवाईदरम्यान कॅफेतील कंपार्टमेंटमध्ये काही जण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यांना तोंडी समज देऊन सोडून दिले. दरम्यान, तपासणीदरम्यान कॅफेचालकाकडे कॉफी शॉपचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच कॅफेमध्ये कॉफी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य अथवा खाद्यपदार्थही उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या कारवाईत दामिनी पथकातील वैशाली माळी, सुनीता जाधव, अंजली राजपूत आणि रिना महाजन यांच्यासह रामानंद नगर पोलिसांचे कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी कॅफे मालक विजय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रामानंद नगर पोलिसांकडून सुरू आहे.