गांधी जयंतीनिमित्त जळगावात ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रा’
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच ‘चरखा जयंती’ आणि ‘जागतिक अहिंसा दिना’निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता लालबहादूर शास्त्री टॉवर चौकातून या यात्रेला सुरुवात होणार आहे.


लालबहादूर शास्त्री टॉवर चौकातून सुरू होणारी ही शांती यात्रा पं. नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्थानक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचेल. तेथे यात्रेचे सभेत रूपांतर होणार आहे. नागरिकांनी या शांती यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास व पंचायती राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, खासदार उज्वल निकम, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावीत आणि भरत अमळकर यांना निमंत्रित करण्यात आले असून ते प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा जागर करण्यासोबतच समाजात अहिंसा, परस्पर सद्भावना आणि शांततामय सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे.
यावेळी ‘भारत की संतान’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, त्यातून देशातील विविध राज्यांच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे. कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मार्गदर्शन लाभणार असून उपस्थितांना अहिंसा प्रतिज्ञा दिली जाणार आहे. तसेच गांधीतीर्थतर्फे घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.