जळगावात सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! ५ लाखांची लाच मागणाऱ्या जिल्हा उपनिबंधकावर ‘एसीबी’चा सर्जिकल स्ट्राईक!

0

जळगाव : जळगाव मधून पुन्हा एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. संबंधित प्रकरणात सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर चर्चेनंतर ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे तपासात समोर आले.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर एसीबीने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. पडताळणीत लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्यानंतर अधिकाऱ्यांविरोधात सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार २० मे रोजी एसीबीच्या पथकाने कारवाई करत संबंधित खासगी व्यक्तीला रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. चौकशीत ही रक्कम उपनिबंधकांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचे समोर आले आहे.

या कारवाईनंतर दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसीबीकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.