पेट्रोल नसल्याने वाद; संतप्त तरुणांकडून पंप कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला
जळगाव : पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात २१ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एरंडोल तालुक्यातील म्हसावद गावातील पेट्रोल पंपावर ही घटना घडली. तुषार गुरव असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, पंपावर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने त्याने आलेल्या दोन तरुणांना इंधन देण्यास नकार दिला होता.


याच कारणावरून दोन्ही तरुण संतप्त झाले आणि त्यांनी तुषारसोबत जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद हिंसक बनला आणि संशयितांनी चाकू काढून तुषारच्या पोटात वार केला.
या हल्ल्यात तुषारच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पोटात खोल जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तुषारला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.