शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली! कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित
मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने बहुप्रतीक्षित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये एकूण 5,029 कोटी रुपये हस्तांतरित केले. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आली असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने यानंतर सर्व बँकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्वरित खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच, पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली यादी जाहीर करून ती सर्व ग्रामपंचायतींकडे पाठविण्यात आली होती. या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नव्हती. फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे होते. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.”
ते पुढे म्हणाले, “आज जवळपास 5,029 कोटी रुपये 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून त्यांची कर्जखाती शून्य झाली आहेत. एनपीए खात्यांवर आकारण्यात आलेले व्याज बँकांनी माफ केल्यामुळे शासनाने जमा केलेली रक्कम आणि कर्जाची रक्कम समान झाली व त्यामुळे ही खाती नील झाली.”
12 लाख खात्यांतील त्रुटी दूर करूनही मिळणार लाभ
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 12 लाख कर्जखाती त्रुटी दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठविण्यात आली आहेत. बँकांकडून आवश्यक दुरुस्ती करून ही खाती आठवडाभरात पुन्हा शासनाकडे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर त्या पात्र शेतकऱ्यांच्याही कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही पडताळणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.