जळगाव जिल्हा पोलीस दलात फेरबदल ; चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी १९ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करत चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. या फेरबदलात आर्थिक गुन्हे शाखा, AHTU तसेच शनीपेठ आणि बोदवड पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदांमध्ये बदल करण्यात आला आहे.

आदेशानुसार, पोलीस निरीक्षक आशिष मधुकर लकांडे यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयस्वाल यांची शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेतून शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या दुय्यम अधिकारी पदावरून प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांना AHTU प्रभारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले असून त्या मानव संसाधन विभागात मूळ नियुक्तीच्या ठिकाणी काम पाहणार आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक सागर शिंपी यांनाही शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.

बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.