इंधनाचा महाभडका! १० दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; जळगावात पेट्रोल ११३.१७ तर डिझेल ९९.८४ रुपयांवर.

0

जळगाव/मुंबई । सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आधीच जवळपास एक हजार रुपयांची मोठी वाढ झालेली असताना, आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचाही भडका उडाला आहे. मागील ४ दिवसांत इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून, चालू मे महिन्यातील ही तब्बल चौथी दरवाढ आहे. आज, २५ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू झाली आहे.

नवीन दरानुसार, पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ७३ पैसे, पॉवर पेट्रोल २ रुपये ७३ पैसे, तर डिझेल २ रुपये ८१ पैशांनी महागले आहे.

अवघ्या १० दिवसांत ८ रुपयांची वाढ!
यापूर्वी १५ मे, १९ मे आणि २३ मे रोजी इंधनाचे दर वाढले होते. आज २५ मे रोजी झालेल्या चौथ्या दरवाढीमुळे अवघ्या दहा दिवसांत वाहनचालकांच्या इंधन खर्चात प्रतिलिटर सुमारे ८ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कररचनेतील बदल यामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर (प्रतिलिटर):

जळगावात इंधनाच्या दराने उच्चांक गाठला आहे. येथे पेट्रोल ११३.१७ रुपयांवर पोहोचले असून, डिझेल ९९.८४ रुपये झाले आहे. (डिझेल १०० रुपयांच्या उंबरठ्यावर आहे).मुंबईत पेट्रोल २.७६ रुपयांनी वाढून १११.२१ रुपये, तर डिझेल २.८१ रुपयांनी वाढून ९७.८३ रुपये झाले आहे. दिल्लीत डिझेलचा दर ९५.२० रुपये, तर पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रतिलिटर झाला आहे.

मालवाहतूक महागणार; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
या लागोपाठच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. सर्वात महत्त्वाची चिंता म्हणजे डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे देशभरात मालवाहतुकीचा (वाहतूक खर्च) खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम येत्या काही दिवसांत भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.