जळगावमध्ये विजेच्या धक्क्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

0

जळगाव । मुलाला विजेचा जोरदार धक्का बसल्याचे पाहताच आईने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, नियतीचा घाला असा की, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईलाही विजेचा धक्का बसला. या हृदयद्रावक घटनेत आई आणि मुलगा अशा दोघांचाही मृत्यू झाला. जळगाव शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहन टॉकीजजवळील आसोदा रोड परिसरात घराजवळ विद्युत तार पडलेली होती. या तारेला स्पर्श झाल्याने ३५ वर्षीय राहुल सपकाळे यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मुलगा विजेच्या धक्क्याने अडचणीत सापडल्याचे पाहताच त्यांची आई सुनंदा सपकाळे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, या प्रयत्नात त्यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला.

घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने राहुल आणि सुनंदा सपकाळे यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. आई आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची बातमी समजताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज हेलावून टाकणारा होता.

क्षणात हसते-खेळते कुटुंब दुःखाच्या सावटाखाली आले. मुलाला वाचवण्यासाठी आईने केलेल्या प्रयत्नांचा शेवट दोघांच्याही मृत्यूने झाल्याने परिसरातील नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मृतांचे नातेवाईक उमेश कोळी यांनी दिली.

दरम्यान, घराजवळ विद्युत तार पडलेली असल्याने दोन जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेमुळे विद्युत तारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित वीज यंत्रणेने विद्युत तारांची नियमित तपासणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.