जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये Trigger-१ (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ मधील अधिकारांचा वापर करून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई केली आहे.


या आदेशात हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, कोणत्याही प्रकारची पेंढ, टीएमआर व इतर पशुखाद्य यांचा समावेश आहे. तथापि, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला हा आदेश लागू राहणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हा आदेश दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील ते आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.