केळी व्यापाऱ्याची टोकाची भूमिका! चिनावल येथे राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

0

सावदा । सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल येथे एका सधन तरुण शेतकऱ्याने आणि केळी व्यापाऱ्याने राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर गावठी कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. निर्मल युवराज महाजन (वय २७) असे मृताचे नाव असून, मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन हा शेतीसोबतच मोठ्या प्रमाणावर केळीचा व्यापार करत होता. मंगळवारी (दि. ६) मध्यरात्री १२:०५ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली आतून बंद करून घेतली. त्यानंतर देशी बनावटीच्या पिस्तुलातून (गावठी कट्टा) उजव्या कानशिलावर गोळी झाडून घेत त्याने आत्महत्या केली. बंदुकीच्या आवाजाने कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यादरम्यान घटनास्थळावरून एक देशी बनावटीचा कट्टा, पाच रिकाम्या पुंगळ्या (खोके) आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. घटनास्थळी पाच रिकाम्या पुंगळ्या कशा आढळल्या, तसेच हा गावठी कट्टा मृताकडे कुडून आला, याबाबत आता परिसरात विविध संशय आणि चर्चांना उधाण आले आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आर्थिक परिस्थिती संपन्न असतानाही अवघ्या २७ वर्षीय तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले? यामागे कौटुंबिक, व्यावसायिक की अन्य काही गूढ कारण आहे, याचा सखोल तपास आता सावदा पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.