पावसाचा जोर कायम; हतनूर धरणातून विक्रमी पाण्याचा विसर्ग सुरू

0

जळगाव । हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर धरणाचे नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी हतनूर धरणाचे ३० दरवाजे पूर्णक्षमतेने उघण्यात आले असून यामुळे तापी नदीपात्रात ५,१२८ घनमीटर प्रति सेकंद (१,८१,०९५ क्यूसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

धरणाची सध्याची पाणीपातळी २११.१९० मीटर इतकी असून धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (FRL) २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण (Gross) पाणीसाठा २४३.६० दशलक्ष घनमीटर (६२.७८ टक्के) तर उपयुक्त (Live) पाणीसाठा ११०.६० दशलक्ष घनमीटर (४३.३७ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, उजव्या कालव्यातून ५.६६ घनमीटर प्रति सेकंद (२०० क्यूसेक) पाण्याचा विसर्ग सुरू असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

गेल्या २४ तासांत धरण परिसरात ११६ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ३७४ मिमी इतके झाले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक कायम आहे.

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.