सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी; चांदीही कडाडली

0

जळगाव । सोन्याच्या दरातील तेजीचा सिलसिला कायम असून जळगावच्या सराफा बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली असून चांदीच्या दरानेही वेग घेतला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति तोळा २ हजार ३०० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात प्रति किलो १ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाजारात ही तेजी कायम असल्याने मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा विक्रमी पातळीकडे वाटचाल करत आहेत.

ताज्या दरवाढीनंतर जळगावमध्ये जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ६४ हजार ७९ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना वाढलेल्या दराचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही सातत्याने तेजी कायम आहे. दरवाढीनंतर चांदीचा भाव प्रति किलो २ लाख ५६ हजार ४७० रुपयांवर पोहोचला आहे.

चार दिवसांत सोन्याची 7,800 रुपयांची वाढ

विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार ८०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याच कालावधीत चांदीच्या दरातही मोठी तेजी दिसून आली असून प्रति किलो तब्बल १९ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील सलग वाढीमुळे सराफा बाजारात खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचे लक्ष दरांच्या पुढील हालचालींकडे लागले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, मागणी आणि पुरवठा यानुसार सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.