संतापजनक ! अघोरी पूजेच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार

0

पालघर । महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमधील खरात प्रकरण ताजा असतानाच, आता पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आजारपणावर अघोरी पूजा आणि गावठी औषध देण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे पालघर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून कासा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास चक्रे फिरवून नराधम भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीवर सध्या पालघरमधील कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. तिच्यावर गावरान/गावठी उपचार करण्यासाठी पीडितेचे कुटुंबीय संशयित भोंदू बाबा शिवराम परशु सावर (वय ५५ वर्ष) याच्या संपर्कात आले होते. ३ मे २०२६ रोजी आरोपी शिवराम हा स्वतःची इको कार (ECO) घेऊन आणि एका साक्षीदाराला सोबत घेऊन खताडपाडा येथे आला. तेथून त्याने फिर्यादी, पीडित मुलगी आणि तिच्या काकांना कारमध्ये बसवून ‘गावठी औषध देतो’ असे सांगत चरी पावण (ता. डहाणू, जि. पालघर) परिसरात आणले.

मध्यरात्री जंगलात नेऊन अत्याचार; जीवे मारण्याची धमकी
४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. तत्पूर्वी, ३ मे रोजी रात्री ११:३० वाजता आरोपीने औषध आणण्याच्या बहाण्याने पुन्हा सर्वांना कारमध्ये बसवले. चरी पावण येथील रस्त्याच्या कडेला कार उभी करून त्याने सोबतच्या इतर लोकांना गाडीतच थांबण्यास सांगितले.

पीडित मुलगी अवघी १३ वर्षांची आणि अल्पवयीन आहे हे ठाऊक असतानाही, आरोपी शिवराम सावर याने तिच्या अज्ञानाचा आणि असहायतेचा फायदा घेतला. अघोरी पूजेचे सोंग रचून तो पीडितेला रस्त्यापासून दूर अंधाऱ्या जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. “या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारून टाकीन,” अशी धमकीही या नराधमाने चिमुरडीला दिली. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी कासा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडितेच्या प्रकृतीला प्राधान्य देत तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि तत्परतेने कारवाई करत आरोपीला २ तासांत अटक केली.

या प्रकरणी आरोपी शिवराम परशु सावर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या अघोरी आणि संतापजनक प्रकरणाचा पुढील सखोल तपास पालघर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.