पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा; फटाक्यांच्या वापरावर निर्बंधांचे पालन करा- अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण

0

जळगाव । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील फटाके विक्रेते तसेच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री व वापर करू नये, तसेच फटाके वाजविण्यासाठी केवळ सायंकाळी ७ ते रात्री १० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक व सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार १२५ डीबी (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर बेकायदेशीर आहे. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथियम, आर्सेनिक, लीड व मर्क्युरी यांसारखे घटक असलेल्या फटाक्यांच्या वापरावर बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू निर्माण होऊन प्राणी, वनस्पती तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणातही मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी स्फोटक अधिनियम १८८४ व स्फोटक नियम २००८ मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाके वाजविण्याच्या वेळेचे पालन करणे बंधनकारक आहे.

शैक्षणिक संस्थांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. पोलीस प्रशासनाने आदेशांची अंमलबजावणी करावी, तर महानगरपालिका व नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन होत असल्याची पडताळणी करून दक्षता घ्यावी.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनी व पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी तक्रारींसाठी ०२५७-२२२१२८८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा srojalgaon@mpcb.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. प्राप्त तक्रारींवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

नागरिकांनी मातीचे दिवे व पणत्या उजळाव्यात, प्लास्टिकचा वापर टाळून कागदी किंवा कापडी आकाशकंदील लावावेत, फटाक्यांचा वापर टाळावा. तसेच प्लास्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, झाडांवर विद्युत रोषणाई करू नये आणि टाकाऊ व पुनर्वापरयोग्य वस्तूंचा वापर करावा. फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त व प्रदूषणमुक्त हरित दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.