जळगावात भेसळखोरांना दणका! दिवाळीच्या तोंडावर २४० किलो संशयित खवा पकडला
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच संधीचा फायदा घेऊन होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सने जळगावात आणण्यात आलेला तब्बल २४० किलो संशयित बनावट खवा प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला आहे. या जप्त केलेल्या खव्याची किंमत अंदाजे ६५ हजार रुपये असून, या कारवाईमुळे ऐन दिवाळीत खवय्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवाळीत मिठाई तयार करण्यासाठी खव्याला प्रचंड मागणी असते. गुजरातमधील अहमदाबाद येथून संशयास्पद खव्याचा साठा जळगावच्या बाजारपेठेत पाठवला जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकाने शहरातील ‘श्री बालाजी ट्रॅव्हल्स’च्या कार्यालयाबाहेर सापळा रचून तातडीने तपासणी केली.


तपासणीदरम्यान पथकाने २४० किलो संशयित खवा ताब्यात घेतला. अधिकाऱ्यांनी खव्याचे नमुने (Samples) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
पुढील कठोर कायदेशीर कारवाई:
प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खवा नेमका भेसळयुक्त किंवा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधितांविरुद्ध ‘अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार’ (FSSAI) कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अहमदाबादहून आणलेला हा संशयित खवा जळगावमधील नेमक्या कोणत्या व्यापाऱ्याने किंवा मिठाई विक्रेत्याने मागवला होता, याचा कसून शोध प्रशासनाकडून घेतला जात असून यातून आणखी मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.