जळगाव पोलिसांची मोठी धडक कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करत ७ जणांवर गुन्हे दाखल
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस डोके वर काढणाऱ्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला तडाखा देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी विविध ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत एकूण ५ गुन्हे दाखल करत ७ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, तब्बल ५० लाख १० हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू चोरीला कठोरपणे आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून धडक कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले होते. या निर्देशानुसार ४ नोव्हेंबर २०२६ रोजी भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलिसांच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली.


भडगाव पोलीस ठाणे (दोन आरोपी):
भडगाव पोलिसांच्या पथकाने वलवाडी बुद्रुक (ता. भडगाव) येथे कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून १२ ब्रास वाळू आणि २ डंपर असा एकूण ४१ लाख ३२ हजार ६६६ रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नशिराबाद पोलीस ठाणे (दोन आरोपी):
नशिराबाद हद्दीतील तरसोड फाट्या जवळील हायवे पुलावर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यांच्याकडून ३ ब्रास वाळू आणि एक डंपर असा ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जळगाव तालुका पोलीस ठाणे (तीन कारवाया):
जळगाव तालुका पोलिसांनी फुकनगरी गावाच्या नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर तीन स्वतंत्र छापे टाकले. यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत तीन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या तीनही कारवायांमध्ये एकूण ५ ते ६ ब्रास वाळू आणि ३ ट्रॅक्टर असा एकूण ६ लाख ४८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी व पथकाने पार पाडली.
पोलिसांच्या या धडक सत्रामुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भविष्यातही असा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.