कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून यावल तालुक्यातील शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

0

यावल । यावल तालुक्यातील दहिगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी विश्वास उर्फ पिंटू रामकृष्ण पाटील (वय ४०) यांनी कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी तब्बल आठ दिवस झुंज दिल्यानंतर गुरुवार, १८ जून रोजी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे दहिगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कर्जबाजारी शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर स्टेट बँकेसह खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेमुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. वाढत्या आर्थिक संकटामुळे त्यांनी ११ जून रोजी सकाळी विषारी पदार्थ प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणाची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विश्वास पाटील यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दहिगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच बँकांच्या कर्जामध्ये अनेक तरुण शेतकरी थकबाकीदार असल्याचे सांगितले जात आहे. वाढते कर्जबाजारीपण, शेतीतील आर्थिक अनिश्चितता आणि मानसिक तणावामुळे शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

शासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच कर्जमाफीसारख्या निर्णयांचा विचार करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.