अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम
जळगाव जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि वाळूच्या बेकायदा उपशाविरोधात जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नदीपात्र तसेच जंगल परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई करत भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

नदीपात्रात उतरून पाहणी


बुधवारी (१९ ऑगस्ट) जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तालुक्यातील खेडी, कानळदा यासह विविध ठिकाणच्या नदीपात्रांची दुचाकीने तसेच पायी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत माहिती घेतली.
संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाळू प्रकरणात कोणतीही तडजोड न करता ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त
जिल्ह्यातील नदीपात्र आणि जंगल परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी भट्ट्या उद्ध्वस्त करून दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यरात्री वाळू वाहतुकीवर कारवाई
वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी मध्यरात्रीही कारवाईचा धडाका कायम ठेवला. धरणगाव पोलिसांनी शालिक संजय चव्हाण (२६) आणि विवेक शेषराव सपकाळे (२४, रा. नारणे, ता. धरणगाव) यांच्यावर कारवाई केली.
सावदा पोलिसांनी सुरेश जगन्नाथ सोनवणे (४८, रा. पिंपरुड, ता. यावल) याच्यावर कारवाई केली. रावेर पोलिसांनी आमीन शब्बीर तडवी (२२) आणि अकील लतीब तडवी (रा. पाल, ता. रावेर) यांच्याविरुद्ध कारवाई केली.
ममुराबाद ते खेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.