भुसावळ मार्गे धावणाऱ्या दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’
जळगाव : मध्य रेल्वेने उत्तर भारताकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत दादर–गोरखपूर–दादर आणि दादर–बलिया–दादर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांना नियमित मेल/एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत विशेष गाडी क्रमांकाने धावणाऱ्या या दोन्ही गाड्या आता नवीन नियमित गाडी क्रमांकांसह धावणार आहेत. या दोन्ही गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा असल्याने मुंबई जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होऊ शकणार आहे.

दादर–गोरखपूर मार्गावरील विशेष गाडी क्रमांक ०१०२७ आता ११०४७ दादर–गोरखपूर एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. ही सेवा १८ ऑगस्टपासून सुरू होईल. दादरहून ही गाडी दर मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी म्हणजे आठवड्यातून चार दिवस धावेल. दादरहून गाडी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी गोरखपूरला पोहोचेल.


गोरखपूर–दादर मार्गावरील विशेष गाडी क्रमांक ०१०२८ आता ११०४८ गोरखपूर–दादर एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. ही सेवा २० ऑगस्टपासून नियमित होईल. गोरखपूरहून ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. गोरखपूरहून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी दादरला पोहोचेल. मार्गावरील प्रमुख थांब्यांमध्ये कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, टीकमगड, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड आणि बनारस यांचा समावेश आहे.
दादर–बलिया मार्गावरील विशेष गाडी क्रमांक ०१०२५ चे रूपांतर ११०४३ दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. ही गाडी १७ ऑगस्टपासून नियमित स्वरूपात धावणार आहे. दादरहून ही सेवा दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, म्हणजे आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असेल. दादरहून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी बलियाला पोहोचेल.
बलिया-दादर मार्गावरील विशेष गाडी क्रमांक ०१०२६ चे रूपांतर ११०४४ बलिया-दादर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. ही सेवा १९ ऑगस्टपासून नियमित होणार आहे. बलियाहून गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार धावेल. बलियाहून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी दादरला पोहोचेल. कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, टीकमगड, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड आणि बनारस यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
दोन्ही नियमित एक्स्प्रेस गाड्यांना एकूण १७ डबे असतील. त्यामध्ये १ एसी २-टियर, ३ एसी ३-टियर, ७ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग-कम-गार्ड ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे. त्यामुळे वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी विविध पर्याय उपलब्ध राहणार आहेत. विशेष गाड्यांचे नियमित गाडी क्रमांकांमध्ये रूपांतर झाल्यामुळे आरक्षण करताना जुन्या गाडी क्रमांकांऐवजी नवीन क्रमांक वापरणे महत्त्वाचे आहे. गाडीचे सविस्तर वेळापत्रक, स्थानकनिहाय थांबे आणि अद्ययावत धावण्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीवर तपासता येईल. प्रवाशांना एनटीईएस ॲपद्वारेही माहिती मिळू शकते. तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा वापर करता येईल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडी क्रमांक, वार आणि वेळ तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.