मोठी बातमी! CJP च्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

0

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ उभारण्यात आलेल्या सीजेपीच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नीट पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपीने मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्येही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलन करून पाठिंबा दर्शविला होता. काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, तर काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.

सीजेपीचा सरकारवर गंभीर आरोप

दिल्लीतील आंदोलन मागे घेतल्यानंतर सीजेपीने पत्रकार परिषद घेत अनेक भाजपशासित राज्यांमध्ये आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू असल्याचा आरोप केला. आंदोलनात सहभागी झालेल्यांवरील कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा पुन्हा देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला होता.

सीजेपीने दावा केला होता की, आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल केला जाणार नाही किंवा कारवाई केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन देण्याची तयारी दर्शविली आहे.

फडणवीसांचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन ते मागे घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य पोलिसांना दिले आहेत.

या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यातील विविध शहरांमध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.