फडणवीस सरकारच्या कॅबीनेट बैठकीत तडकाफडकी 4 मोठे निर्णय!
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ४ मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यात कोकणातील रेल्वे स्थानकाच्या नामकरणासह, शासकीय बदल्या, देवस्थान जमीन आणि रस्ते प्रकल्पांबाबतचा समावेश आहेत. या निर्णयांची आता लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय


सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण (परिवहन विभाग)
कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नामकरणाबाबतचा हा अधिकृत प्रस्ताव आता मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे.
शासकीय बदल्यांना मुदतवाढ (सामान्य प्रशासन विभाग)
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ या कायद्यामध्ये आवश्यक सुधारणेस मंजुरी देण्यात आली आहे.
डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराला जमीन (उद्योग विभाग)
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टचा जमिनीचा वापर नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफ (महसूल विभाग)
‘नवीन नागपूर’ आणि ‘नवीन बाह्य वळण रस्ता’ प्रकल्पासाठी मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन वाटाघाटीने थेट खरेदी केली जाणार आहे. या खाजगी जमिनीच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय बैठकीत घेण्यात आला.