पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची मोठी संधी! भुसावळात २ जुलै रोजी विमा प्रतिनिधींसाठी थेट मुलाखत!
जळगाव । भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्या कार्यालयामार्फत थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे जोडून दि. २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून शैक्षणिक पात्रता म्हणून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, मार्केटिंग कौशल्य आणि स्थानिक भागाची माहिती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, माजी विमा प्रतिनिधी, विमा सल्लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वयंसेवी संस्था चालक यांनाही अर्ज करता येणार आहे.
विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत व थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांचेकडे राखीव असल्याचे कळविण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.