चाळीसगावच्या वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडले
जळगाव : जळगाव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी थांबण्याचे नाव घेत नाहीये. जिल्ह्यात दर आठवड्याला सरासरी एक ते दोन लाचखोरीचे प्रकार समोर येत असून अशातच चाळीसगावमध्ये एसीबीने लाचखोरावर कारवाई केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई (२४ जून) चाळीसगाव येथे करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक यशोलाल विठ्ठल महाजन (वय ५३), वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव, जि. जळगाव यांनी तक्रारदाराच्या मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामाच्या बिलाची रक्कम काढून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.


तक्रारदार यांच्या शेतात वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासनाकडून तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले होते. या कामासाठी सादर केलेल्या खर्चाच्या बिलापैकी ५० हजार रुपयांचे देयक मंजूर करून देण्यासाठी आरोपीने बिलाच्या १५ टक्के प्रमाणे ७,५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपीने मागितलेली ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत चौधरी, अनिल गांगुर्डे आणि योगेश शिंदे यांचा समावेश होता. जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी कारवाईस सहकार्य केले.