अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची अत्यंत धक्कादायक आणि नवीन यादी समोर आली असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या नव्या यादीतून पक्षाचे राष्ट्रीय चेहरा राहिलेले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव गायब आहे. इतकेच नव्हे तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आणि पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे.

या राजकीय भूकंपानंतर पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा रंगली असतानाच, अजित पवारांच्या दोन्ही मुलांकडे मात्र पक्षाची मोठी सूत्रे सोपवण्यात आली आहेत. या नवीन कार्यकारिणीत जुन्या फळीला बाजूला सारत अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची राष्ट्रीय पदे देण्यात आली आहेत:

पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर जय पवार यांची राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षात अधिकृत एन्ट्री झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव सरचिटणीस पदावरून वगळण्यात आले आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि वळसे-पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे यादीत नसल्याने अजित पवारांनी जुनी फळी पूर्णपणे बाजूला करून ‘नवे नेतृत्व’ आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादीच्या या नव्या यादीत सुबोध मोहिते, सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, अभिषेक बोके, संजय प्रजापती, धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग आणि डॉ. रमण प्रीत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेल्या या कार्यकारिणीमुळे अजित पवार गटासह राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.