मुक्ताईनगर हादरले! डंपर-दुचाकीची भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

0

मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्याजवळ सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृताचे शीर धडापासून वेगळे झाले.

याबाबत असे की, रावेर तालुक्यातील अजंदे येथील रहिवासी प्रल्हाद मधुकर हिवरे (४०) आणि ईश्वर नामदेव पवार (३८) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीडी १८५८ वरून मलकापूर येथून अजंदे गावाकडे जात होते. याचदरम्यान नायगाव फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद ७५३ या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावरील बीएनए कंपनीच्या डंपर क्रमांक एमएच १९ सीवाय ४६१७ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील प्रल्हाद हिवरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात ईश्वर पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. दरम्यान, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.या भीषण अपघातामुळे अजंदे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.