अभय मोकाशी : पत्रकारितेतील एक धगधगता निखारा !

0

मराठी पत्रकारितेतील एक नव्वदी ओलांडलेले परंतु आजही ठणठणीत, सक्रीय असे भीष्माचार्य. काही दिवसांपूर्वी ते आजारी झाल्याने इस्पितळात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर त्यांनी मला भ्रमणध्वनी करुन, “अरे योगेश, मी आताच इस्पितळातून घरी आलो. उपचाराचा खर्च बराच झाला आहे. शासकीय व्यवस्थेकडून काही आर्थिक सहाय्य मिळू शकेल कां ?”, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. मी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे, सरचिटणीस श्री. दिपक भातुसे, कार्यकारिणी सदस्य श्री. खंडुराज गायकवाड, पोलिटिकल जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री विवेक भावसार यांच्याशी संपर्क साधला. धडाधड चक्रं फिरली आणि एका पक्षाच्या माध्यम समन्वयकांनी चक्क त्या भीष्माचार्यांची निवासस्थानी भेट घेतली आणि बऱ्यापैकी रक्कम सुपूर्द केली.

(या ठिकाणी जाणीवपूर्वक मी नांवे टाळली आहेत.) अरे व्वा ! मला नाही होऊ शकली शासकीय मदत, परंतु माझ्या शिफारशी वरुन चक्क २४ तासात प्रश्नाची सोडवणूक झाली ? मनस्वी समाधान झाले. पण लगेचच माझ्या डोळ्यासमोर अभय मोकाशी यांचा चेहरा आला. अभय मोकाशी, मी आणि डॉ. प्रवीण भाटिया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहोत. तसेच अभय मोकाशी यांच्या आजारासंदर्भात माझी आणि डॉ. प्रवीण भाटिया यांच्या समवेत नेहमी चर्चा होत असते. त्यामुळे डॉ प्रवीण भाटिया यांच्या समवेत संपर्क साधला. आपण कुठे आहात ? तातडीने मला आपल्याशी अभय मोकाशी यांच्या संदर्भात बोलायचे आहे. आपण घरीच या. रात्रीचे ७.४४ वाजले होते. तात्काळ डॉ. भाटिया माझ्या घरी हजर झाले. त्यांच्या समवेत श्री. प्रदीपभाई कोठारी हेही आले होते. फार मोठा माणूस. डॉ. प्रवीण भाटिया आणि मी गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून पत्रकारितेच्या आणि सामाजिक क्षेत्रात एकत्र. अगदी कौटुंबिक संबंध. चहा नाश्ता झाला. अभय मोकाशी यांना श्रीकृष्ण नगर, बोरीवली पूर्व येथील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात दाखल करण्यात आले होते. योगायोगाने श्री. प्रदीपभाई कोठारी यांची डॉ अनिता मयेकर यांच्या बरोबर ओळख होती.

प्रदीप भाई कोठारी यांनी सांगताच आम्ही तत्काळ डॉ. प्रवीण भाटिया यांच्या मोटारीतून ‘माऊली’च्या दिशेने निघालो. पहिल्या मजल्यावर डॉ अनिता मयेकर यांचे दालन. आम्ही त्या दालनाबाहेर बसलो. निरोप पाठविला. काही रुग्णांना मार्गदर्शन केल्यावर आम्हाला बोलावले. म्हणजे श्री. कोठारी यांना. त्यांच्या बरोबर आम्ही होतोच. दरम्यान अभय मोकाशी यांचे थोरले बंधू संदेश मोकाशी, चिरंजीव गौरव आणि सूनबाई सौ. सोनल यांचीही भेट झाली होती. प्रत्येकाचा चेहरा चिंताग्रस्त. डॉ मयेकर म्हणाल्या, “अहो, उद्या त्यांचा वाढदिवस. त्यांच्या घरी (श्री. संदेश मोकाशी) सर्व व्यवस्था केली. अगदी अती दक्षता विभागात असते तश्शीच. पण आताची परिस्थिती फारच गंभीर आहे. काढली तर रात्र सुद्धा, नाहीतर एक तासही काढणार नाही”. मनात धस्स झालं. चला आपण बघू या. जिन्याने पाचव्या मजल्यावर गेलो. तिथे अती दक्षता विभागात अभय बिछान्यावर होते. मान कलंडलेली. तोंड उघडे. मनात म्हटले काही खरे नाही. डॉ अनिता मयेकर पुढे झाल्या. परिचारिकांनी अभयना सरळ केले. डॉ. मयेकर पटकन म्हणाल्या, “गंगाजल आणा.” चित्र स्पष्ट होऊ लागले. संदेशभाऊ, गौरव, सोनल, डॉ. भाटिया आणि मी अशा पाचही जणांनी चमचा चमचा गंगाजल अभयच्या मुखात दिले. आम्ही अती दक्षता विभागातून बाहेर आलो. डॉ मयेकर यांनी तातडीने ईसीजी काढला. जी रेष वरखाली होत होती ती चक्क सरळ रेषेत दिसू लागली. तो ईसीजीचा कागद घेऊन डॉ. मयेकर म्हणाल्या, “बघा, संपलं सगळं” घड्याळात बरोबर अकरा वाजले होते. मी पटकन प्रसाद मोकाशी यांना भ्रमणध्वनी केला आणि “अभय मोकाशी गेले”, एवढंच सांगितले. प्रसाद मोकाशी हे ज्येष्ठ पत्रकारांच्या दोन दिवसांच्या मेळाव्यासाठी लोणावळ्याला गेले होते. त्यांनी माझे वाक्य ऐकताच, “अरे, आपला अभय गेला”, असे सांगितले. लगेचच घनश्याम भडेकर यांनी समाजमाध्यमावर एका ओळीत माहिती दिली,”ज्येष्ठ पत्रकार श्री अभय मोकाशी यांचे निधन झाले आहे.” मग विस्तृत माहिती छायाचित्रासह मी दिली. डॉ प्रवीण भाटिया अगदी ओक्साबोक्शी रडत होते. कारण गेल्या काही वर्षांपासून अभय मोकाशी आणि डॉ. प्रवीण भाटिया हे एकत्रच फिरत असत. गेल्या पाच महिन्यांपासून अभय मोकाशी यांच्यावर उपचार सुरु होते. आणि त्यांच्या आजाराबद्दल अद्ययावत माहितीसाठी समाज माध्यमाचा एक समूह बनविण्यात आला होता. सक्काळीच संदेश मोकाशी यांनी भाटिया यांना ‘प्रकृती चिंताजनक’ असे (क्रिटिकल) कळविले होते. तीन वर्षांपूर्वी अभय मोकाशी यांच्या पत्नी सौ. सरोज यांचे देहावसान झाले, तेंव्हा खरा आधार कुटुंबियांबरोबरच डॉ. भाटिया यांनीच दिला होता. मी, प्रसाद मोकाशी आणि सुधीर ब्रह्मे आम्ही अभय मोकाशी यांच्या संदर्भात सातत्याने बोलत असू आणि काही करता येईल कां हे पहात होतो.

बऱ्याच किचकट बाबी होत्या. ‘सरकारी काम आणि नऊ महिने थांब’ अशी गत होती. अधिस्वीकृती पत्रिकेचे नूतनीकरण झालेले नव्हते. भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळते की नाही, याची चिंता होती. परंतु मनाचा हिय्या करुन संदेश मोकाशी आणि त्यांचा परिवार ‘तळहाताच्या फोडासारखे’ अभय मोकाशी यांना जपत होते. पहाटे पहाटे रुग्णवाहिकेतून दहिसर येथील रुस्तमजी रेसिडेन्सी या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले. घरी गर्दी नको म्हणून थेट बोरीवली (पूर्व) येथील दौलतनगर स्मशानभूमीत दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. अर्थात निकटवर्तीय आणि पत्रकारितेतील मित्र घरी पोहोचलेच. संजय जोग ठाण्याहून आले तर प्रज्ञा मधू रावकर या नाना चौकातून आल्या. त्याही आपल्या अश्रूंना रोखू शकल्या नाहीत. कारण प्रज्ञाकन्या सई हिला अभय मोकाशी हे मुलीप्रमाणे मानत आणि मार्गदर्शन करीत असत. रविंद्र वैद्य, वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, विनायक बेटावदकर, मधू उपासनी, बाळ देशपांडे, मधू रावकर, प्रफुल्लकुमार मोकाशी आणि अभय मोकाशी असे अनेक डाव्या विचारसरणीचे, समाजवादी विचारसरणीचे सहकारी. त्यामुळे प्रज्ञा भावूक होणे साहजिकच होते. स्मशानभूमीत गुरबीरसिंग, सचिन कलबाग, प्राजक्ता सामंत, निखिल दीक्षित, प्रशांत नाकवे, योगेश नाईक, कृष्णा वारीयेर, दिप्ती सिंह, प्रभाकर पवार, रवींद्र राऊळ अशी असंख्य मंडळी आली. सर्वच सोपस्कार विधीवत पार पडल्यानंतर बरोबर ९.२७ वाजता चिरनिद्रेसाठी अभय मोकाशी यांचे पार्थिव विद्युतदाहिनीत सुपूर्द करण्यात आले. ६९ व्या वाढदिवसाच्या दिवशीच अभय मोकाशी हे अनंतात विलीन झाले. छोटेखानी शोकसभेत सर्वांनीच, “अभय मोकाशी यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. अभय मोकाशी यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”, असे सांगितले. अभय मोकाशी म्हणजे पत्रकारितेतील एक धगधगता निखारा होता. इंग्रजी पत्रकारितेतून सरकारवर आसूड ओढणारा मराठमोळा पत्रकार म्हणून अभय मोकाशी यांची ओळख. तत्वनिष्ठ, सिद्धांतवादी. जे पटेल तेच बोलणार, रुचेल तेच करणार. कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही, असा खाक्या. नवोदितांना योग्य, बिनचूक मार्गदर्शन आणि संपादक असूनही बातमीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. वृतपत्र छपाईसाठी वेळेवर पाने रवाना करतांना पटकन बातमी स्वतः लिहून हातावेगळी करतांनाही ज्या बातमीदाराचे श्रेय आहे, ते त्याच बातमीदाराला देतांना त्याचे श्रेयनाम ठळकपणे छापणार. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे प्रकाश गुप्ते यांना अतीशय हलाखीचे जीवन जगावे लागले.

पण अभय मोकाशी यांनी दिलेल्या बातमीमुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाय उतार व्हावे लागले. कोणत्याही राजकीय पक्षासाठी ताटाखालचे मांजर बनण्यापेक्षा खणखणीत, परखडपणे आपली विचारसरणी कायम जपून ठेवीत, त्या पद्धतीने अख्खे आयुष्य जगले. तरुणांनी पत्रकारितेत कसे कार्य करावे याचा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला. यासाठी अकादमीही स्थापन केली. नवनवीन पत्रकार त्यांनी घडविले. पत्रकार संघटनांमधून चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. काही वृत्तपत्रे बंद पडून पत्रकार बेरोजगारीच्या खाईत लोटले जाऊ नयेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांविरोधात शड्डू ठोकायलाही त्यांनी कमी केले नाही. पत्रकारांसाठी राष्ट्रीय पातळीवर योग्य ते निर्णय घेण्यात यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांकडून पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी यांना आयोगाची स्थापना आणि त्यांची अंमलबजावणी करणे यावर त्यांचा कटाक्ष असे. बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट ही संघटना ट्रेड युनियनच्या धर्तीवर होती म्हणून त्यांनी त्या संघटनेचा सरकार विरोधात चळवळ , लढा उभारण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विशेष उपयोग करुन घेतला. प्रसंगी काळ्या फिती लावून, मोर्चा काढून लोकशाही मार्गाने आंदोलन करणे याचा तर अभय मोकाशी यांनी अवलंब सातत्याने केला. अलिकडच्या काळात टाइम्स ऑफ इंडिया ने सुरु केलेला ‘इंडिपेंडंट’ काही कारण परत्वे बंद केला. ‘इंडियन पोस्ट’ हे इंग्रजी वृत्तपत्र बंद पडले. त्यावेळी ते आंदोलनात अग्रभागी होते. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून ते हिरीरीने आंदोलनात सहभागी होत असत. मिड डे चे ज्येष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे यांची ११ जून २०११ रोजी हत्या झाली, त्यावेळी पत्रकारांनी अक्षरशः रान पेटविले होते आणि प्रचंड मोर्चा काढला होता. त्यातही ते अग्रभागी होते. लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवतांना परिणामांची पर्वा केली नाही. जुन्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. लोकसभा मतदारसंघातून दिग्गज उमेदवारांसमोर उभे राहण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. लिहिण्यासारखे खूप आहे. अभय मोकाशी हा पत्रकारितेतील ज्वलंत इतिहासाच्या कादंबरीचा विषय आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची आज कुणाचीही पात्रता नाही. परंतु अलिकडच्या काळातील दिनू रणदिवे, मधू शेट्ये अशा दिग्गजांच्या मांदियाळी मध्ये बसणारे लढवय्ये पत्रकार म्हणून अभय मोकाशी, जतीन देसाई यांचे नाव निश्चितच घ्यावे लागेल. आज संघटनांच्या नावाखाली दुकाने चालविणारे महाभाग बरेच आहेत. पण आपल्याला कोणताही रंग चिकटवून घेण्याएऐवजी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून देणारा पत्रकारितेतील धगधगता निखारा म्हणजे अभय मोकाशी हेच म्हणावे लागतील.

कॉम्रेड अभय मोकाशी यांच्या कार्यकर्तृत्वाला लाल सलाम !

-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

Leave A Reply

Your email address will not be published.