तीन दशके बहुविध आणि बहु माध्यमातून पत्रकारिता करणारे संपादक म्हणजे महेश म्हात्रे : प्रसन्न जोशी
मुंबई | महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे यांना मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते रविवारी संध्याकाळी दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित पहिल्या पत्रकार संमेलनात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. एबीपी माझाचे कन्सल्टींग एडिटर प्रसन्न जोशी यांनी महेश म्हात्रे यांच्या तीन दशकांच्या पत्रकारितेचा आढावा आपल्या खुमासदार शैलीत घेतला. न्या. धर्माधिकारी यांनी मुळ्येकाकांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला… भन्नाट व्यक्तिमत्व म्हणून ओळखण्यात येणारे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचे आयोजन असलेल्या या पहिल्या पत्रकार संमेलनात खास निमंत्रित केलेले शंभरहून अधिक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
प्रसन्न जोशींनी महेश म्हात्रेंच्या कारकीर्दीवर टाकला प्रकाश
यादरम्यान एबीपी माझाचे कन्सल्टंट एडिटर प्रसन्न जोशी यांनी महेश म्हात्रे यांच्या करकीर्दीवर प्रकाश टाकला. १९९१ पासून तीन दशके महेश म्हात्रे यांनी बहुविध आणि बहूमाध्यमिय पत्रकारिता केलीय, असे प्रसन्न जोशी म्हणाले. गीतकार सुधीर फडकेंनी ज्याप्रमाणे प्रतिभेची ‘रेंज’ जपली तशाच पद्धतीने आयुष्यभर ‘रेंज’ जपून पत्रकारिता करणारे म्हणजे महेश म्हात्रे, या शब्दांत प्रसन्न जोशी यांनी म्हात्रे यांचे वर्णन केले. अशा प्रकारची बहुभाषिक आणि बहु माध्यमांची रेंज असणारे खूप कमी पत्रकार आहेत. सध्याची पत्रकारिता एकांगी आणि आक्रस्ताळेपणाकडे झुकत असतांना महेश म्हात्रे यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियात निर्विष, निष्पक्ष पत्रकारिता केलीय आणि ते मला फार विशेष वाटते, असे प्रसन्न जोशी म्हणाले. मराठी पत्रकारितेतील महेश म्हात्रे यांचे फीचर्स लेखन विशेष चांगले असते, मी आवर्जून वाचतो, असे सांगायला देखील ते विसरले नाहीत.
नाट्यकर्मी अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्ये काका, ज्यांची अफलातून आणि अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष ख्याती आहे. त्यांनीच, महाराष्ट्रात पहिल्यांदा भरलेल्या या पत्रकार संमेलनाचे आयोजन एक ‘दैनिक वाचक’ या नात्याने केले होते. संमेलनाचे शीर्षकच “अध्यक्ष” नसलेले “माझे” पत्रकार संमेलन असे होते.
आपल्या मिश्किल आणि रोखठोक भाषणातून मुळ्ये काका यांनी या संमेलनाच्या आयोजना मागील हेतू सांगितला. “आपल्या कारकीर्दीत ज्या पत्रकार मंडळींची मदत झाली, त्यांच्यासाठी एक असे संमेलन भरवले पाहिजे, ज्यात सुश्राव्य संगीत मैफल असेल, सुग्रास भोजन आणि गप्पांची रेलचेल असेल, हे दोन वर्षापासून मनात होते. आज ते प्रत्यक्षात आले, याचा आनंद आहे,” असे अशोक मुळ्ये (काका) म्हणाले. आपल्या शाब्दिक फटकेबाजी सह मुळ्ये यांनी, गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा धावता आढावा घेतला.
न्या सत्यरंजन धर्माधिकारी आणि
महेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात मुळ्ये काकांच्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि यशस्वीतेसाठी ॲड संजीव सावंत, डॉ लीना सावंत, श्री आणि सौ महेश मुद्दा, नरेंद्र हेटे नीता लाड, विनायक गवांदे, कल्पना राणे, शेखर जोशी यांचे सहकार्य लाभले.