जळगाव जिल्ह्यात वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज

0

जळगाव । मे महिन्यात वातावरणात मोठा बदल झाला. खरंतर मे महिना उन्हाळ्यातील सर्वात उष्ण महिना असतो. मात्र यंदा या महिन्यात अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून अशातच आता ३१मे पर्यंत जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस कायम राहणार आहे.

दरम्यान, आगामी चार दिवस जिल्ह्यात ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यासाठी हवामान विभागाकडून जिल्ह्यात ‘यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून यंदाच्या मे महिन्यात आतापर्यंत ११ दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात एक दिवस उष्णतेच्या लाटेसाठी, तर १० दिवस मुसळधार पावसासाठी आतापर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर एक दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता दरम्यान, सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी आहे.मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अवकाळी व त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दिवसा दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत काहीअंशी ढगाळ वातावरण, तर काहीअंशी ऊन कायम राहते, त्यानंतर सायंकाळपासून मात्र वातावरणात बदल होऊन काही तालुक्यांमध्ये पावसाला हजेरी लागत असल्याचे चित्र गेल्या महिन्याभरापासून पाहायला मिळत आहे.

३१ मेपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मे महिन्यात २५ ते ३० मिमी पाऊस झाला आहे. तसेच ३१ मे पर्यंत जिल्ह्यात पाऊस कायम राहणार आहे. हेच नाही तर २३ में पासून अरबी समुद्रात चक्रवाती हवेचे क्षेत्र विकसित व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २५ मे पर्यंत या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ मे पासून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातदेखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.