अहमदाबाद येथील तरुणाने अमळनेरातील लॉजमध्ये घेतला गळफास
अमळनेर । गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने अमळनेर येथे बस स्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ शर्मा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या सौरभ शर्माविरुद्ध अहमदाबादमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरातमधील अहमदाबाद येथे दाखल पोस्कोच्या गुन्ह्यातील एका संशयिताने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर बस स्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
अहमदाबाद येथील सौरभ शर्मा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम. पी. या नावाने भाड्याने राहत होता. रोज तो अकराला उठवायला सांगायचा. मात्र, सोमवारी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते, की मला उशिरा उठवा. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी हॉटेलचे कर्मचारी त्याला उठवायला गेले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही, म्हणून पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून सौरभने लॉजमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात हलवला. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.