जळगाव शहरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार

0

जळगाव । जळगाव शहरात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील दूध फेडरेशन रोडवर मध्यरात्री झालेल्या गोळीबारात पाठीत गोळी लागल्याने २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

नाजीम फिरोज पटेल (वय २५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. नाजीम शेप बनवण्याचा व्यवसाय करतो. तो आपल्या आई-वडील व दोन भावांसह पाळधी येथे राहतो.

14 मे रोजी रात्री 10 वाजता नाजीम आपले मामा बबलू पटेल व मित्र तोहित देशपांडे, अल्ताफ शेख यांच्यासह चारचाकी (MH-19-Q-7514) ने भुसावळ येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास ते कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रम आटोपून परतत असताना, पाळधीकडे जात असताना, मध्यरात्री 2 वाजता दूध फेडरेशन रोडवर बबलू पटेल गाडी चालवत असताना अचानक गोळीबार झाला.

या गोळीबारात मागच्या सीटवर बसलेल्या नाजीमच्या पाठीत उजव्या बाजूस गोळी घुसली. ही घटना घडताच नाजीमला तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय राम शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.