शिव सरस्वती फाउंडेशनचा मिलेट महोत्सव सुरु : सिन्नर येथील महोत्सवाचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन
इगतपुरी: सोमठाणे येथील शिवसरस्वती फाउंडेशन आणि कृषी विभागातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने ह्या महोत्सवात बचत गट उत्पादने, पौष्टिक तृणधान्य विक्री व प्रदर्शन होणार आहे. हा मिलेट महोत्सव सिन्नर येथील वंजारी समाज मैदानावर १९ ते २१ फेब्रुवारीला सकाळी ९ पासून रात्री ९ ह्या वेळेत होणार आहे. नागरिकांना यानिमित्ताने मिलेटपासून म्हणजेच भरडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्या १९ फेब्रुवारीला उदघाटन सोहळा होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे भूषवणार आहेत. २१ फेब्रुवारीला परिसंवाद, पाककला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. २१ फेब्रुवारीला उत्पादक व खरेदीदार विक्री संमेलन व समारोप होईल. नागरिकांनी मिलेट खरेदी, विविध कार्यक्रमाचा आरोग्यपुर्ण लाभ घेण्यासाठी मिलेट महोत्सवाचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगदीश पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे यांनी केले आहे.
महोत्सवामध्ये विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट. सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या सहभागी होणार आहेत. या ठिकाणी उत्पादकांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असुन ग्राहकांना अस्सल तृणधान्ये व यापासुन तयार करण्यात येणारा रवा, लाह्या, बिस्किटे, इडली- मिक्स, डोसा मिक्स, आईसक्रिम इत्यादी नाविण्यपुर्ण अशी उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व विषयी नामांकित तज्ञांची मार्गदर्शनासाठी उपस्थिती, खरेदीदार-विक्रेते संमेलन, मिलेटपासून बनविण्यात येणा-या उत्पादनांची प्रात्यक्षिके अशी विविध कार्यक्रमांचे आयोजन या कालावधीत असणार आहे..