जळगावसह ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (८ ऑगस्ट) नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

‘या’ ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात प्रामुख्याने नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसू शकतो. या भागांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी

यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. सध्या ‘अल निनो’चा (El Nino) वाढता प्रभाव आणि पावसाची ओढ यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने त्रस्त आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर हवामानात होणाऱ्या या अचानक बदलांमुळे काही भागांत नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळू शकतो.

पावसाचे कारण काय?

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या परिसरामध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम म्हणून आज पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ एक नवीन ‘कमी दाबाचे क्षेत्र’ तयार होण्याचा अंदाज आहे. या प्रणालीची पुढील वाटचाल कशी राहते, यावरच महाराष्ट्रातील आगामी पावसाचे स्वरूप आणि तीव्रता अवलंबून असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.