अवकाळी पावासाचा जळगावसह या तीन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका; बळीराजा संकटात!

0

जळगाव । एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढला असताना गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विशेष जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत सुमारे २,६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात अवकाळी पावासाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर या केळीबहुल भागाला बसला. वादळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची फुलगळ झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

धुळे –
गेले दिवस दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केळी, पपई, त्याचबरोबर हरभरा, गहू आणि कांदा पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्याचबरोबर संबंधित कृषी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देखील आमदार काशीराम पावरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासन स्तरावर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील आमदार काशीराम पावरा यांनी स्पष्ट केले.

जळगाव –
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. ऐन हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल आणि जळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचे नुकसान झाले.

सांगली –
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलामुळे हाता तोंडाला आलेली द्राक्षबाग वाया जात आहे. द्राक्ष घडकुजणे रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने द्राक्ष शेती केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बदलते हवामान यामुळे या द्राक्ष पिकाला फटका बसत आहे. गेल्या काही दिवस धुके पडल्याने द्राक्षाचे घड कुजू लागले आहेत. तर त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.