धक्कादायक ! जळगाव मनपाची जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे खोदून चोरीस, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव । जळगाव शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात मनपाचे माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यात अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान नरेंद्र पानगडे यांना पायास फ्रॅक्चर होऊन प्लास्टर बांधले असल्याने त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. तर सुनील महाजन हे फरारी आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे बिडाचे एकूण सहा पाईप व अडीच लाख रुपयांचे जेसीबी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी कोणाचा सांगण्यावरून चोरी केली, या गुन्ह्यात अजून कोणाचा समावेश आहे, आदींची तपास देखील सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.