जळगावमधील बीएचआर प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : आर्थिक गैरव्यवहार करत ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात जळगावमधील बीएचआर (भाईचंद हिराचंद रायसोनी) पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात एकाच दिवशी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल केला. गृह विभागाच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सुनील झंवर याने गृहविभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन चौकशी सुरू होती. त्यानंतर गृहविभागाच्या आदेशाने गुन्हा नोंदवला गेला असल्याचे समजते. एकाचवेळी तीन गुन्हे, तसेच दोन ठिकाणी तक्रारदार उपस्थित नसतानाही घाईत आणि कोणतातरी हेतू ठेवून गुन्हे नोंदवले असे नवटक्के यांच्यावर दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
बीएचआरप्रकरणात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर व पिंपरी-चिंचवडमधील आळंदी पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२० मध्ये तीन गुन्हे नोंदवले होते. पुण्यातील तपास आर्थिक गु्न्हे शाखेकडून सुरू होता. पतसंस्थेने स्वस्तात मालमत्ता विकत घेणे, तसेच कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी जळगावमधून सुनील झंवरला अटक केली होती. तसेच, जळगावमधील मालमत्तेवर छापा टाकला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालिन पोलीस उपायु्कत भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली होती. पोलिसांच्या पथकाने जळगावत १० ठिकाणी छापे टाकले होते.