गुटख्याच्या वाहनास अभय दिल्याने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह 4 कर्मचारी निलंबित
जळगाव । जळगाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असून याच दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेले गुटख्याचे वाहन मात्र परस्पररीत्या सोडून दिल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुक्ताईनगरचे उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्यासह चार कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका कारला थांबवून तपासणी केली. त्या कारच्या डिक्कीसह मागच्या बाजूला गुटखा आढळून आला. संबंधित वाहनावर कारवाई करून गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, पोलिस पथकाने कारचालक पैसे ट्रान्स्फर करून मार्गस्थ झाला.
मात्र यानंतर पुढाऱ्यासह त्याच्या कार्यकर्त्यांनी ती कार पोलिस ठाण्यात आणली व गुन्ह्याची नोंद केली. कार चालकाकडून उपनिरीक्षक राहुल बोरकर, कर्मचारी गजानन महाजन, डिंगबर कोळी, निखिल नारखेडे, सुरेश पाटील यांनी पैसे फोन-पेवर स्वीकारल्याचे चौकशीत आढळून आले. कर्तव्यात कसूर केल्याच्या अहवालावरून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उपनिरीक्षक व चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.