नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्वीस्ट; नरहरी झिरवळांचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा
नाशिक । राज्यात लवकरच शिक्षक मतदारसंघ निवडणुक पार पडणार असून या निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशातच नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना आमदार नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिला आहे. झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी अचानक ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
निवडणुकीत संदीप गुळवे यांचे काम करा, अशा सूचना नरहरी झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, आज संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यानंतर नरहरी झिरवळ यांनी गुळवे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.